MHT CET 2021 Date: महाराष्ट्रातील अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि औषधनिर्माण प्रवेशांसाठी होणारी सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात MHT CET च्या तात्पुरत्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यानुसार ही परीक्षा दोन सत्रात होणार आहे. पहिले सत्र ४ सप्टेंबर २०२१ ते १० सप्टेंबर २०२१ तर दुसरे सत्र १४ सप्टेंबर २०२१ ते २० सप्टेंबर २०२१ या कालावधीत होईल. अन्य हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, मॅनेजमेंट अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी सीईटीचे आयोजन २६ ऑगस्ट २०२१ पासून होणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही घोषणा केली. ते पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्य सीईटी सेलमार्फत या परीक्षांचे आयोजन केले जाते.
MBA, MCA, MArch, BHMCT, MHMCT या सीईटींचे आयोजन २६ ऑगस्ट २०२१ पासून करण्यात येणार आहे. याशिवाय राज्यातील बीए, बीकॉम, बीएससी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशांसाठी मात्र सीईटी होणार नसून ते बारावीच्या गुणांवर होतील, अशी माहिती सामंत यांनी दिली.
सीईटीचे आयोजन आणि त्यानंतरच्या प्रवेशांसाठी लागणारा अधिकचा वेळ, कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवरील राज्यातील दळणवळणाचे निर्बंध, पावसाळा, तिसऱ्या लाटेची शक्यता आदी सर्व अडथळे लक्षात घेऊन पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशांसाठी सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करणे उचित राहणार नाही, यावर गुरुवारी दुपारी यासंदर्भात झालेल्या कुलगुरुंच्या बैठकीत एकमत झाले, अशी माहिती सामंत यांनी दिली. महाविद्यालयातील प्रवेश क्षमतेत कमाल २० टक्के इतक्या मर्यादेत वाढ करण्याबाबत आदेश निर्गमित केले जाणार आहेत. परिणामी या महाविद्यालयांना अतिरिक्त विद्यार्थ्यांना सामावून घेता येईल, असेही त्यांनी सांगितले.